चेन्नई : मुंबईहून १६८ प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलेल्या गोएअरच्या जी ८-३०५ या विमानास एका एअरोब्रिजने शुक्रवारी सकाळी धडक दिली. यामुळे विमानाचे काही नुकसान झाले असून, प्रवासी सुरक्षित आहेत. विमानात एका नवजात बालकासह एकूण १६८ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुखरूप असल्याचे गोएअरने स्पष्ट केले.नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काम करीत असताना एअरोब्रिजचा आॅपरेटर कथितरीत्या फोनवर बोलत होता आणि त्यामुळे हा अपघात घडला. गोएअरच्या जी ८-३०५ मुंबई-पोर्टब्लेअर व्हाया चेन्नई या विमानास सकाळी ६ वाजून ३५ मिनिटाला एका एअरोब्रिजने धडक दिली. विमान विमानतळावर उभे होते आणि एअरोब्रिज जुळण्याची प्रतीक्षा करीत होते. याचदरम्यान भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) एअरोब्रिज आॅपरेटर जेटब्रिज विमानाशी जोडण्यास अपयशी ठरला. एअरोब्रिजची गती जास्त असल्याने व ती नियंत्रित न करता आल्याने त्याने थेट विमानास धडक दिली. या धडकेत विमानाच्या पुढील दरवाजाच्या भागाचे मोठे नुकसान झाल्याचे गोएअरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
‘एअरोब्रिज’ची विमानाला धडक
By admin | Published: July 11, 2015 1:37 AM