नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातप्रकरणी बिनशर्त माफी मागणारी योगगुरु रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण यांची प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यांनी त्यांची चूक पकडल्या गेल्यानंतर माफी मागितली, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
आम्ही या प्रकरणात इतके उदार होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले. ‘हे प्रकरण इतक्या सहजतेने घेण्यात येणार नाही. आम्ही तुमचा पर्दाफाश करू,’ असे खंडपीठाने म्हटले आहे.कोर्टाने सांगितले की, जेव्हा बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले तेव्हा त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत अस्वीकारार्ह आहे. पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी ठेवली आहे.
राज्य परवाना प्राधिकरण झोपेत‘आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटते आहे की, फायली पुढे पाठवण्याव्यतिरिक्त राज्य परवाना प्राधिकरणाने काहीही केले नाही आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून या विषयावर ते गाढ झोपेत आहेत,’ असे ताशेरे कोर्टाने ओढले.