लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुबईतून मुंबईत आलेल्या अफगाणिस्तानच्या वाणिज्यदूताने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये १८ कोटींचे २५ किलो सोने लपवून आणल्याचे उघडकीस आले आहे. राजनैतिक पासपोर्ट असल्यामुळे तिला अटक झालेली नसून तिच्याकडील सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली. झाकिया वॉर्डक, असे महिला वाणिज्यदूताचे नाव आहे. सोन्याच्या तस्करीत देशात प्रथमच अन्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.
वॉर्डक ही आपल्या मुलासह दि. २५ एप्रिल रोजी दुबईतून मुंबईत पहाटे दाखल झाली. तिच्याकडे सोने असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्या विमानतळावर सीमा शुल्क विभागात येऊन या सोन्याची माहिती देऊन बाहेर पडतात का याची अधिकारी वाट पाहत होते. परंतु ती ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला थांबवून सामानाची झडती घेतली. मात्र, त्यात सोने आढळून आले नाही. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी तिची अंगझडती घेतली असता परिधान केलेल्या कपड्यांच्या आत प्रत्येकी एक किलो वजनाचे २५ सोन्याचे बार लपवल्याचे आढळले. या सोन्याबाबत कोणताही कागदपत्रे तिला सादर करता आली नाहीत. तिच्याकडे राजनैतिक पासपोर्ट असल्याने तिला अटकेपासून संरक्षण मिळाले.
साेशल मीडियावर जाहीर केला राजीनामाया संदर्भात वॉर्डकने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून मला व कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मला त्रास दिला जात आहे. माझे चारित्रहनन करण्याचा प्रयत्न होत आहे. मी यापुढेही माझ्या देशाची सेवा करत राहील. आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचेही तिने जाहीर केले.