रांची - अमेरिकन सैन्य माघार घेत असतानाच अफगाणिस्तामधील अश्रफ घानी सरकार उलथवून लावत तालिबाननेअफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. (Afghanistan Crisis) दरम्यान, काँग्रेस आमदार आणि झारखंडचे माजी कार्यकारी अध्यक्ष इरफान अंसारी यांनी आता तालिबानचे कौतुक करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. इरफान अंसारी यांनी सांगितले की, येथील लोक आता खूश आहेत. अमेरिकन तिथे जाऊन अफगाणिस्तान आणि तालिबानवर अत्याचार करत होते. आई-बहिणी आणि मुलांनाही त्रास देत होते. त्याविरोधातीलच ही लढाई आहे. तसेच जे काही पसरवले जात आहे ते चुकीचे आहे. (Congress MLAs irfan ansari support Taliban; That said, now the Afghan citizens are happy)
जामताडा येथून दुसऱ्यांदा आमदार बनलेल्या इरफान अंसारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अफगाणिस्तानमधून अमेरिकेला पळवून लावल्याबद्दल तालिबानचे कौतुक केले पाहिजे. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये किती अत्याचार करत होती, हे सर्वांना माहिती आहे.
दरम्यान, इरफान अंसारी यांनी केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला आहे. तालिबानचे समर्थन करणारे काँग्रेस आमदार हे देशाचे शत्रू आहेत, अशी टीका भाजपाचे राज्यसभा खासदार दीपक प्रकाश यांनी केले आहे. त्यालाही इरफान अंसारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा केवळ तालिबानच्या मुद्द्यावर चर्चा करू इच्छितो, ज्यामुळे भारतातील मुख्य मुद्द्यांवरून लक्ष हटवता येईल. यावेळी एका पत्रकाराने अफगाणिस्तानमध्ये १० वर्षांवरील मुलींनाही शिक्षणाच्या अधिकार मिळला पाहिजे का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तुम्ही माझ्यासोबत चला, मग मी याचं उत्तर देतो.
इरफान यांच्या विधानावर भाजपाने जोरदार पलटवार केला आहे. अशा प्रकारची भाषा काँग्रेसची तालिबानी विचारसरणी दाखवून देते, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश यांनी सांगितले. ते अशा दहशतवादी संघटनेचे समर्थन करत आहेत, जी संघटना महिला अल्पसंख्याकांबाबतच्या क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. तिथून लोक पलायन करत आहेत. अंसारी यांना इथेही अशी परिस्थिती पाहायची आहे का, असा सवालही भाजपाकडून विचारण्यात आला आहे.