नवी दिल्ली/काबुल: अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं तयारी सुरू केली. मात्र या मोहिमेला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं तिथे विमानं उतरवली जाऊ शकत नाही. त्यामुळे काबुलला जाणारी विमानं रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. एअर इंडियाचं विमान रात्री ८.३० ऐवजी १२.३० वाजता काबुलसाठी उड्डाण करणार होतं. मात्र आता हवाई हद्दच बंद असल्यानं विमान उड्डाण करू शकणार नसल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या एअरलिफ्टला विलंब होणार आहे.
एअर इंडियाची दोन विमानं स्टँडबायअफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबाननं दिली आहे. मात्र भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियानं दोन विमानं स्टँडबायवर ठेवली आहेत. केंद्राचे आदेश मिळताच ही विमानं दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे.
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दोन विमानं सज्ज ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारकडून एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत. काबुलच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज असलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काबुलमधील हमीद करझाई आंततराष्ट्रीय विमानतळावरून होत असलेली हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे.
'काबुलमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत,' असं एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे रात्रीपासून हवाई वाहतूक बंद आहे. एअर इंडियाचं एक विमान दररोज काबुलसाठी उड्डाण करतं.