नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारेअफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या भोगल भागात फरीबा नावाची एक अफगाणी महिला एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहते. आपल्या देशापासून दूर राहूनही ती सध्या आनंदी आहे. कारण तिला भारतात आदर आणि शांततेचे जीवन जगता येत आहे. पण फरीबाची आधीची कहाणी ऐकल्यावर तालिबानींचा क्रूर चेहरा समोर येईल. फरीबाचं लग्न एका तालिबानी मुलाशी झालं होतं.
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी कुटुंबाने तिचे लग्न केलं होतं. नंतर जेव्हा तिला दोन मुली झाल्या तेव्हा फरीबाच्या नवऱ्याने आपल्या दोन्ही मुले विकल्या. त्याने 26 वर्षे फरीबाचा छळ केला. पण आता ती तिचे आयुष्य पुन्हा शांततेत आणि आनंदात जगण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानी पतीने तिला कसा त्रास दिला याचा पुरावा तिच्या शरीरावर असलेल्या असंख्य जखमांवरून दिसून येतो. आता भारतात उपचार घेतल्यानंतर फरीबाची प्रकृती चांगली आहे. तिच्या खोलीच्या एका छोट्या कोपऱ्यात, एक जुनं पुस्तक आहे. त्या पानांदरम्यान एक फोटो लपवून ठेवला आहे.
फरीबाची दोन बोटं या फोटोत कापलेली पाहायला मिळत आहेत. तालिबानने केलेल्या अत्याचाराची आठवण करून देण्यासाठी फरीबाने हा फोटो ठेवला आहे. तिच्या शरीरावर अशा अनेक जखमा आहेत. फरीबा आता दिल्लीच्या लाजपत नगर भागात जिम ट्रेनर म्हणून काम करत आहे. फरिबाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यामुळे तिचे लग्न वयाच्या 14 व्या वर्षी झाले होते. अफगाणिस्तानात महिलांना कोणाशी लग्न करायचे हे स्वातंत्र्य नाही. फरीबा सांगते की, लग्नानंतर काही वर्षांनी तिने दोन मुलींना जन्म दिला. मात्र काही दिवसातच तिच्या पतीने आपल्या मुलांना विकलं.
फरीबाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पती आणि सासरच्यांना खूप विनवणी केली पण सर्व काही व्यर्थ ठरले. तिचा नवरा किंवा तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केले नाही. फरीबा स्वतःच्या मुलीच्या विक्रीनंतर खूपच खचून गेली होती. मात्र आता भारतात आश्रय मिळाल्याने फरीबाला खूप आनंद झाला आहे. भारतात बसून ती अफगाणिस्तान वेगाने होत असलेल्या गोष्टी पाहत आहे. "जगात भारतासारखा देश असूच शकत नाही. सर्व धर्म, जाती आणि राष्ट्रांचे लोक येथे शांततेने राहतात. जर मी इथे आले नसते तर असंही जीवन जगणं शक्य आहे हे मला कधीच कळलं नसतं" असं देखील तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.