काबुल: अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी तालिबाननं दिली आहे. मात्र भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियानं दोन विमानं स्टँडबायवर ठेवली आहेत. केंद्राचे आदेश मिळताच ही विमानं दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे.
'काबुलमधील भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही दोन विमानं सज्ज ठेवली आहेत. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत,' असं एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. काबुलमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे रात्रीपासून हवाई वाहतूक बंद आहे. एअर इंडियाचं एक विमान दररोज काबुलसाठी उड्डाण करतं.