नवी दिल्ली: दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला. दोन दशकांनंतर अफगाणिस्तानमध्येतालिबानची राजवट आली आहे. देशातील परिस्थिती बिघडत चालली असून लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांना मायदेशी आणण्यासाठी अभियान सुरू करण्यात आलं आहे. यानंतर आता अफगाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारनं अफगाणी नागरिकांसाठी 'ई-आपत्कालीन व्हिसा' या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. 'केंद्रीय गृह मंत्रालयानं अफगाणिस्तानातील सद्यस्थिती पाहून व्हिसा प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. भारतात प्रवेशासाठी फास्ट ट्रॅक व्हिसा अर्जांसाठी ई आपत्कालीन एक्स विविध व्हिसा' नावानं इलेक्ट्रॉनिक व्हिसाची एक श्रेणी सुरू करण्यात आली आहे,' अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. विविध विकास योजनांमध्ये आणि अभियानांमध्ये भारताला सहकार्य केलेल्या सर्व अफगाणी नागरिकांना व्हिसा जारी करण्यात येणार आहे.
अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांसोबतच अफगाणी शिख आणि हिंदू समुदायांच्यादेखील संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. 'अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांना भारताकडून मदत दिली जाईल. विकास, शिक्षण क्षेत्रात भारतात सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्या पाठिशी भारत उभा राहील. त्यांना सर्वतोपरी मदत करेल,' असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.