गुरुग्राम: 'त्या' महिला खासदाराच्या मोबाईलवर दररोज हजारो मेसेज येतात. मात्र सोमवारी दुपारी आलेल्या एका मेसेजनं तिच्या पायाखालील जमीन सरकली. तो मेसेज काबुलहून तिच्या भावानं केला होता. तालिबानी इथे आलेत, ते शेजारी आहेत, अशा आशयाचा तो मेसेज होता. हॉटेलच्या रिसेप्शनवरून चेक आऊट केल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
अफगाणिस्तानच्या एक महिला खासदार सध्या हरयाणातल्या गुरुग्राममध्ये आहेत. एका खासगी रुग्णालयात त्यांच्या आईवर उपचार सुरू आहेत. रक्ताची गाठ काढण्यासाठी त्या २ आठवड्यांपूर्वीच भारतात आल्या. अवघ्या काही दिवसांत संपूर्ण अफगाणिस्तानतालिबान्यांच्या ताब्यात जाईल याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. आपल्या मायदेशी दहशतवाद्यांची राजवट येणं त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे आहे.
राजधानी काबूल तालिबान्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे. सत्तापालट झाला आहे. राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले आहेत. महिला खासदाराचं कुटुंब मात्र अफगाणिस्तानातच आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. १९ वर्षांचा मुलगा आहे. 'दोन दिवसांपासून त्यांचे अश्रू थांबलेले नाहीत. एक-एक क्षण वर्षासारखा भासतोय,' अशा शब्दांत ३९ वर्षांच्या खासदार महिलेनं भावना व्यक्त केल्या. त्या ईशान्य अफगाणिस्तानातल्या एका राज्याचं संसदेत प्रतिनिधीत्व करतात. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
गुरुग्राममधल्या हॉटेलमधून निघालेल्या खासदार दिल्लीतल्या लाजपतनगरसाठी रवाना झाल्या. 'मला इथे किती दिवस राहावं लागेल त्याची कल्पना नाही. माझं कुटुंब संकटात आहे. मी सातत्यानं तिथल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मात्र असं काही होईल याची माहिती त्यांनी दिली नाही. मी भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन,' असं महिला खासदारानं सांगितलं.