अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. काबुलहून मंगळवारी भारतात आणण्यात आलेल्या एकूण ७८ जणांपैकी १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. यात अफगाणिस्तानच्या गुरुद्वारांमधून गुरू ग्रंथ साहिब घेऊन भारतात परतलेल्या ३ शिखांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी देखील या लोकांच्या संपर्कात आले होते. (Afghanistan evacuees who came to india from kabul found corona positive hardeep singh puri also came in contact)
कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांपैकी कुणालाच गंभीर स्वरुपाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. काबुलहून भारतात आणण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबुलवर कब्जा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरू झाली.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?अफगाणिस्तानातून भारतीयांची सुरक्षित सुटका केली जात असल्याच्या मोहिमेला राजकीय रंग देता कामा नये. भारत नेहमीच अल्पसख्याक नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहिलेला आहे, असं हरदीप सिंग पुरी म्हणाले होते. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून ६२६ जणांना भारतात आणण्यात आलं आहे. यात २२८ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. भारतात आणण्यात आलेल्या लोकांमध्ये ७७ अफगाण शिखांचाही समावेश आहे. शिख समुदायातील नागरिकांनी या कठीण प्रसंगी आसरा दिल्याबद्दल भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले आहेत, असंही ते म्हणाले.