नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र वायव्य अफगाणिस्तानच्या दिशेने जमिनीपासून १० किमी खाली असल्याचे वृत्त आहे.
याआधी शनिवारी अफगाणिस्तानमध्ये ६.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठा हाहाकार माजवला होता. या भूकंपामुळे देशात किमान चार हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दोन हजारांहून अधिक घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत अवघ्या चार दिवसांत दोन मोठे भूकंप झाल्याने अफगाणिस्तानचे मोठे नुकसान होईल, असा अंदाज आहे.
अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, पश्चिम अफगाणिस्तानात शनिवारी झालेल्या भूकंपात चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ANDMA चे प्रवक्ते मुल्ला सैक यांनी सांगितले की, आतापर्यंत २० गावांमधील दोन हजार घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामध्ये चार हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत.
प्रवक्त्याने सांगितले की, विविध संस्थांमधील ३५ बचाव पथकातील एकूण १००० हून अधिक बचाव कर्मचारी बाधित भागात मदत कार्य करत आहेत. अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी हेरात प्रांतातील प्रभावित भागाला भेट देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या एका गटाचे नेतृत्व केले.
चीनने अफगाणिस्तानला केली मदत
चीनने रविवारी अफगाण रेड क्रिसेंटला बचाव आणि आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आपत्कालीन मानवतावादी मदत म्हणून २००,००० अमेरिकी डॉलर नकद स्वरुपात दिले.