लखनौ – अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानी सत्ता आल्यापासून जगभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत तसं भारतातही यावर विविध भाष्य केले जात आहे. सपा खासदार आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं तालिबानचं कौतुक केले आहेत. अशातच प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा(Munawwar Rana) यांनी तालिबान प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुन्नवर राणा म्हणाले की, जितकी क्रूरता अफगाणिस्तानात आहे. त्यापेक्षा जास्त क्रूरता आपल्याकडे आहे. पूर्वी रामराज्य होतं आणि आता कामराज्य आहे. जर रामाकडे काम असेल तर ठीक आहे अन्यथा काहीच नाही. हिंदुस्तानला तालिबानशी घाबरण्याची गरज नाही. कारण अफगाणिस्तानसोबत हजारो वर्षापासून साथ आहे त्यांनी कधी हिंदुस्तानला नुकसान पोहचवलं नाही. जेव्हा मुल्ला उमरची हुकूमत होती तेव्हाही त्यांनी कुठल्याही हिंदुस्तानीला नुकसान नाही केले. कारण त्याचे बापजादे हिंदुस्तानातून कमवून घेऊन गेले आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच जितकी AK 47 तालिबानींकडे आहेत तितकी भारतातील माफियांकडे आहेत. तालिबानी हत्यारं लुटून किंवा मागून घेतात परंतु आपल्या येथील माफीया हत्यारं खरेदी करतात. जोपर्यंत हे सरकार आहे काहीही करु शकतं परंतु वातावरण नेहमी एकसारखं राहत नाही. धर्मांतरणासारख्या मुद्द्यानं देशाला नुकसान होतं. आपला देश पूर्वीसारखा होता तसा व्हावा हीच आमची इच्छा आहे असं मुन्नवर राणा यांनी यूपीतील देवबंद येथे एटीएस सेंटर बनवण्यावर भाष्य केले.
त्याचसोबत उत्तर प्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुस्लीम नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो. महात्मा गांधी साधे होते. नथुराम गोडसे तालिबानी होता. उत्तर प्रदेशात तालिबानीसारखं काम होत आहे असंही मुन्नवर राणा यांनी एका चॅनेलला मुलाखत देताना म्हटलं आहे. मुन्नवर राणा यांनी यापूर्वीही अनेक प्रकरणावर वादग्रस्त विधानं केली आहेत. तालिबानी मुद्द्यावर अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी तालिबानींची तुलना भारतातील स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. शफीकुर्रहमान यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल झाली आहे.