काबुल – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. अफगाणिस्तानातून हत्यारं घेऊन आलेले ट्रक आता पाकिस्तानात पोहचत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शस्त्रांनी भरलेले ट्रक अफगाणिस्तानातून पाकिस्तानात(Pakistan) येत आहेत. १६ ऑगस्टनंतर शेकडोंच्या संख्येने शस्त्रसाठा असलेले ट्रक अफगाणिस्तानच्या सीमेतून पाकिस्तानी चेक पोस्ट क्रॉस करुन पाकिस्तानात आले आहेत असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितले.
माहितीनुसार, तालिबाननं अफगाणिस्तानावर पूर्णपणे कब्जा केल्यानंतर ISI चं मिशन अफगाणिस्तान पूर्ण झालं आहे. त्यामुळेच पाकिस्तानने तालिबानच्या मदतीसाठी जी शस्त्र पाठवली होती ती पुन्हा पाकिस्ताना मागवली जात आहेत. गुप्तचर यंत्रणेनं सांगितल्याप्रमाणे तालिबानला पाकिस्तानची ISI कडून मदत मिळत असल्याचा अंदाज होता. तालिबान्यांना अफगाणिस्तानावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान तयार करत होतं. परंतु आता पाकिस्तानातून जैश आणि लष्करचे ८ हजाराहून जास्त दहशतवाद्यांच्या हालचाली अफगाणिस्तानच्या दिशेने जात असल्याचं दिसून येते.
या दहशतवाद्यांनी तालिबानसोबत मिळून अफगाणिस्तानातील सुरक्षा दलांवर हल्ला केला आणि आता त्याठिकाणी परिसरात कब्जा करुन बसले आहेत. अल्पावधीतच तालिबान ज्यारितीने काबुलपर्यंत पोहचलं ते पाहून जग आश्चर्यचकीत आहे. पाकिस्तानच्या मदतीविना तालिबानला अफगाणिस्तानावर कब्जा करणं सोप्पं नव्हतं. तालिबानविरोधात अनेक ठिकाणी न लढता अफगाणी सैन्यांनी शरणागती पत्करल्याचं दिसून आलं. त्यांनी हत्यारं तालिबानला सुपूर्द केले.
जगभरातील सुरक्षा तज्ज्ञांना या गोष्टीची चिंता आहे की, अमेरिकेतील हायटेक हत्यारं जगासाठी धोकादायक ठरु नयेत. ISI या हत्यारांचा वापर काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना देऊ नये. मागील काही वर्षापासून जम्मू काश्मीरच्या सुरक्षा रक्षकांनी मारलेल्या दहशतवाद्यांकडून मेड इन अमेरिका हत्यारं जप्त केली आहेत. सुरक्षा यंत्रणांना आधीच शंका आहे की, ही हत्यारं अफगाणिस्तानमार्गे काश्मीरच्या दहशतवाद्यांकडे पोहचवली जात आहेत. अशावेळी हजारोंच्या संख्येने अमेरिकन असॉल्ट राइफल, ग्रेनेड आणि अनेक सर्विलांस सिस्टम तालिबानच्या हाती लागले आहेत. ज्याचा वापर भारताविरोधात केला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. पाकिस्तानी दहशतवादी हालचालींवर अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे.
तालिबानच्या हाती लागलं कोट्यवधींचं घबाड
अमेरिकन सैन्याच्या उपकरणांचा एक मोठा हिस्सा तालिबानकडे गेला असल्याची माहिती काल व्हाईट हाऊसनं दिली. या संदर्भातले काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यात तालिबानचे दहशतवादी अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर करताना दिसत आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या हातात दिसणारी शस्त्रास्त्रं आता तालिबान्यांच्या हातात दिसू लागली आहेत. ही शस्त्रं अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना दिली होती. यात यूएस-६० ब्लॅक हॉक आणि कंदहार विमानतळावरील उपकरणांचा समावेश आहे.