लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघारीला सुरुवात करताच तालिबानने एकेक भूभाग काबीज करायला सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सैन्याला अमेरिकेने दिलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. या शस्त्रांद्वारे सर्वप्रथम तालिबान पाकिस्तानात हैदोस घालेल. त्यानंतर शस्त्रस्त्रांची भारतात तस्करी होण्याची भीती भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
तालिबानचा अफगाणिस्तानच्या सैन्याने कुठेही प्रतिकार केला नाही. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर शस्त्रसाठा तालिबानच्या हाती लागला. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे सहज मिळू लागली आहेत.
तालिबान्यांनी सुमारे ५ लाख एम-१६ आणि एम-४ रायफल्स लुटल्या आहेत. याशिवाय अमेरिकन लाईट मशीनगन आणि शस्त्रसज्ज वाहनांवरील ५० कॅलिबरर शस्त्रास्त्रांचाही त्यात समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर स्नायपर रायफल्स, स्टीलच्या गोळ्या, बुलेटप्रूफ जॅकेट्स तालिबानच्या हाती लागले आहे. तसेच हमवीससह २ हजारांहून अधिक सशस्त्र वाहने, यूएच-४० ब्लॅक हॉक विमाने, सशस्त्र हेलिकॉप्टर्स आणि स्कॅनइगल ड्रोन विमानेदेखील पाकिस्तानला मिळू शकतात. या शस्त्रास्त्रांचा आधी पाकिस्तानमध्ये वापर होऊ शकतो. त्यानंतर दहशतवादी ती भारतात वापरण्याचा धोका आहे.
भारतीय लष्करही सज्ज
शस्त्रांचा वापर करून काश्मीरच्या खोऱ्यात घातपाती कारवाया केल्यास भारतीय लष्कर सज्ज असल्याचे लष्कारातील सूत्रांनी सांगितले. तालिबानी दहशतवाद्यांना पाकिस्तानने ९० च्या दशकाप्रमाणे थारा दिल्यास त्यांना सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
‘अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही’ काबूल : पंजशीर खोरे ताब्यात घेण्याचा तालिबानचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी कडक इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचा तालिबानीस्तान होऊ देणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला स्पष्टपणे बजावले आहे. अफगाण नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत हे शक्य नाही आणि आम्ही दडपशाही सहन करणार नाही, असे सालेह यांनी तालिबानला बजावले आहे. तालिबानने पंजशीरमधील भाग ताब्यात घेतल्याचे वृत्तही सालेह यांनी फेटाळले.