लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने पोलिस चौकशीदरम्यान जे सांगितले होते तेच त्याने पॉलिग्राफ व नार्को चाचणीदरम्यानही सांगितले. त्याच्या जबाबात कोणताही बदल नाही. त्याने पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीत तसेच पोलिस चौकशीदरम्यान दिलेली उत्तरे एकसारखी आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या तपासाला कोणतेही नवीन नवे वळण मिळणे टळले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून दिल्लीच्या जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचे कबूल केले. तथापि, पोलिसांना अद्याप श्रद्धाची कवटी सापडलेली नसून, शरीराच्या इतर भागांसह कवटीचाही शोध सुरू आहे. आफताबचे नार्को चाचणीनंतरचे मुलाखत सत्र (पोस्ट नार्को इंटरव्यू सेशन) शुक्रवारी पूर्ण झाले. हे सत्र दोन तास चालले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे (एफएसएल) चार सदस्यीय पथक व तपास अधिकारी नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात आफताबच्या ‘पोस्ट-टेस्ट इंटरव्ह्यू’साठी आले.
डीएनए रिपाेर्ट लवकरच पुढील आठवड्यापर्यंत डीएनए अहवाल अपेक्षित आहे. आतापर्यंत १३ हून अधिक हाडे सापडली आहेत. विशिष्ट हाडांचे प्रमाण व गुणवत्तेची जुळवाजुळव करून श्रद्धाच्या मृत्यूची खात्री केली जाईल. त्याने श्रद्धाची हत्या केली हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.