ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20- राजधानी दिल्लीतील एक कार्यक्रम आज ठरलेल्या वेळेच्या 12 मिनिट उशीराने सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग चांगलेच नाराज झाले. यावेळी त्यांनी देशातील नोकरदारांना वेळेचं महत्व आणि वेळेचं पालन करण्याचं आवाहन केलं.
दिल्लीमध्ये आज सिव्हील सेवा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार होता. कार्यक्रमासाठी राजनाथ सिंग 5 मिनिट आधी पोहोचले, पण कार्यक्रम मात्र, 12 मिनिट उशीरा म्हणजे 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालयाचे अधिकारी आणि काही मुख्य अधिकारी सहभागी झाले होते.
विज्ञान भवनातील या कार्यक्रमाला उशीर झाल्याने राजनाथ यांनी अधिका-यांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली. मी 5 मिनिट आधी आलो होतो पण कार्यक्रमाला उशीर झाल्याने थोडी काळजी वाटली. हा कार्यक्रम वेळेवर सुरू झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं. आपल्यामध्ये काही कमतरता आहे का याचा विचार करायला हवा, आपल्याला जबाबदारीचं भान असायला हवं. तसेच आपण सर्वांनी वेळेचं महत्व आणि वेळेचं पालन करणं गरजेचं आहे असं राजनाथ म्हणाले.