ओडिसा : ओडिसा येथील कटकमध्ये पोलिसांच्या एका चुकीमुळे गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असणा-या आरोपीला तब्बल 15 वर्ष तुरूंगात घालवायला लागली. खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ज्योति प्रकाश साहू याने 15 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर गुन्हा घडला त्यावेळी त्याचं वय 18 वर्षांपेक्षा कमी होता असं समजलं. गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. शनिवारी 15 वर्षांची शिक्षा भोगून प्रकाश साहू तुरूंगाबाहेर आला.
2002 मध्ये एका खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेत प्रकाश साहूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्यावेळी साहूचा खटला लढणा-या वकिलाने आणि पोलिसांनी त्याच्या वयाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. जर तो अल्पवयीन असल्याचं तेव्हाच समजलं असतं तर तुरूंगाऐवजी त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं असतं.
तिस-या वकिलाच्या आलं लक्षात -शुक्रवारी प्रकाश साहूचा खटला पाहणा-या नव्या वकिलांनी ओडीसा उच्च न्यायालयासमोर याबाबत माहिती ठेवली. न्यायधीश आय महांती आणि केआर महापात्रा यांच्या खंडपिठाने गुन्ह्याच्या वेळी साहूचं वय 17 वर्ष 5 महिने आणि 18 दिवस होतं हे मान्य केलं. त्यानंतर साहूला सोडण्याचे आदेश दिले. गुन्हा घडला त्यावेळी पोलिसांनी चार्जशिटमध्ये साहूचं वय 20 इतकं सांगितलं होतं.
2002 मध्ये कटक येथे एका व्यक्तीला आग लावून मारून टाकण्याच्या प्रयत्नात चार जणांना अचक करण्यात आली होती. 2005 मध्ये कटकच्या ट्रायल कोर्टाने चौघांनाही या घटनेत दोषी ठरवलं. पण नंतर अन्य तिघांना जामीन मिळाला मात्र मुख्य आरोपी असलेल्या साहूला जामीन मिळाला नव्हता.