इस्लामाबाद, दि. 5- बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं. तसंच नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं. नवाज शरीफ यांच्यानंतर शाहिद खाकन अब्बासी यांची पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आली. पाकिस्तानचे नवनिर्वाचीत पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या कॅबिनेटने शुक्रवारी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे. मागील २० वर्षांहून जास्त काळानंतर पहिल्यांदात एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 19 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर 28 केंद्रिय मंत्र्यांचा समावेश आहे.
दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चारही प्रांताच्या समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. ६५ वर्षीय लाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. वर्ष २०१३ मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते.तर नवाझ शरीफ यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण आणि ऊर्जा मंत्रालय सांभाळणाऱ्या ख्वाजा आसिफ यांची अब्बासींनी विदेश मंत्री म्हणून निवड केली आहे. पाकिस्तान सरकारला वर्ष २०१३ नंतर प्रथमच पूर्णवेळ विदेश मंत्री मिळाला आहे. पाकिस्तानच्या शेवटच्या विदेश मंत्री या हिना रब्बानी खार होत्या.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना मागील आठवड्यात पनामा पेपर्स भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदावरूनही पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर शरीफ यांचे निकटवर्तीय शाहिद खाकन अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती. पण, अब्बासी यांना पुढील १० महिन्यांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.