नवी दिल्ली - संसदेच्या सुरक्षेत बुधवारी मोठी चूक झाली. सभागृहात ३ अज्ञात तरुणांनी उडी घेतल्यानं गोंधळ उडाला. या तरुणांना तात्काळ पकडण्यात आले. परंतु अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच भयभीत झाले. संसदेच्या हल्ल्याला आज २२ वर्ष होत आहेत. त्यात आजच ही अक्षभ्य चूक सभागृहात घडली त्यामुळे नवीन संसद भवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधी संसद भवनाबाहेर निदर्शन करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेतले त्यानंतर काही क्षणातच अन्य दोघांनी थेट सभागृहात घुसखोरी केली. या घटनेनंतर संसदेत पळापळ झाली.
या घटनेने पुन्हा एकदा २२ वर्ष जुन्या दहशतवादी हल्ल्याची आठवण जागवली. जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला केला होता आणि गोळ्यांच्या आवाजानं देशात शांतता पसरली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
संसदेवरील हल्ल्याचा दिवस अन् पन्नूची धमकीआज संसदेवरील हल्ल्याला २२ वर्ष होतायेत. आजच्याच दिवशी २००१ मध्ये संसद भवनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. यात ५ दहशतवादी ठार झाले.परंतु या घटनेची संसदेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून नोंद झाली.
अलीकडेच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. परंतु तरीही २ आंदोलक संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करताना दिसले. त्यांच्या हातात टायर गॅस कंटेनर होता. त्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यात १ पुरुष आणि १ महिला होती. परंतु त्याच्या काही क्षणातच पुन्हा एकदा सूरक्षेत चूक झाली. २ युवक लोकसभा सभागृहात घुसले. या दोघांनी गॅलरीतून उडी मारली. त्यांच्याकडून काहीतरी सभागृहात फेकण्यात आले.ज्यातून गॅस बाहेर आला. खासदारांनी या तरुणांना पकडले आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.