गोरखपूर- उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. गोरखपूर आणि फुलपूरच्या लोकसभेच्या पोटनिवडणुका एसपी आणि बीएसपी आघाडी करून लढवणार आहेत. तसेच बहुजन समाज पार्टी राज्यसभेतही समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना समर्थन देणार आहे.गोरखपूरमध्ये झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या बैठकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांना समर्थन देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये आव्हान मिळण्याची शक्यता आहे. गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांसाठी 11 मार्च रोजी मतदान होणार असून, 14 मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दोन्ही जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. गोरखपूरमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार होते. तर फुलपूरमधून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य खासदार होते. या दोघांच्या राजीनाम्यानंतर इथे पोटनिवडणुका होत आहेत. आता या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी बहुजन समाज पार्टीनं समाजवादी पार्टीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे.
राज्यसभेसाठी मायावतींनी दिलं समर्थन ?राज्यसभेत पुन्हा जाण्यासाठी मायावतींनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 23 मार्च रोजी 10 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 19 आमदार असलेला बहुजन समाज पार्टी एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाही. अशातच त्यांना एका जागेवर समाजवादी पार्टीच्या समर्थनाची गरज लागणार आहे.