लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी दोन्ही देशांत १० क्षेत्रांमध्ये आणखी सहकार्य वाढविण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर भारत व ओमानने सर्वंकष आर्थिक भागीदारी करार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. इस्रायल व हमास संघर्षामुळे निर्माण झालेली स्थिती, दहशतवादाने उभे केलेले आव्हान, इस्रायल व पॅलेस्टाइन अशा द्विराष्ट्रवादाचा तोडगा या मुद्द्यांवरही मोदी व हथैम बिन तारिक यांच्यात शनिवारी सविस्तर चर्चा झाली.
ही माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक शुक्रवारी भारताच्या दौऱ्यावर आले होते. तब्बल २६ वर्षांनी ओमानचे सुलतान भारताच्या दौऱ्यावर आले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
ओमान करणार भारतात माेठी गुंतवणूकnओमान-भारत संयुक्त निधीच्या तिसऱ्या टप्प्यातील रकमेची दोन्ही देशांनी घोषणा केली. nया २५०० कोटी रुपयांची भारतात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात येईल. या निधीमध्ये दोन्ही देशांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. nस्टेट बँक ऑफ इंडिया व ओमान इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी हे दोघे मिळून या निधीच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. nत्या निधीचा पहिला टप्पा ८३० कोटी रुपयांचा व दुसरा टप्पा १,६६० कोटी रुपयांचा होता.
कोणते करार केले? भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, माहिती-तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक गुन्ह्यांचा व गुन्हेगारांचा छडा लावणे आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व ओमानने करार केले.