नवी दिल्ली - मोठेपणी आपल्याला काय बनायचंय असा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना केला असेल. तुम्हालाही तुमच्या शिक्षकांनी हा प्रश्न विचारला असेलच. नकळत्या वयात त्यावेळी अनेकांनी डॉक्टर, इंजिनिअर, पायलट अशी विविध क्षेत्रातील पदांची नावे घेतली असतील. मात्र त्या वयात शिक्षकांना दिलेलं उत्तर प्रत्यक्षात पूर्ण झालं तर? अनेक वर्षानंतर तुमचे ते शिक्षक तुम्हाला भेटले तर त्यांना देखील याचा आनंद होईल.
अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. सुधा सत्यन नावाच्या शिक्षिका एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून शिकागो जाण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा विमानात कॅप्टनच्या नावाची घोषणा झाली. ते नाव ऐकून सुधा सत्यन यांना 30 वर्षापूर्वीची आठवण ताजी झाली. सुधा या मुंबईत एका प्ले स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. तेव्हा स्कूलमध्ये अनेक विद्यार्थी शिकायला होते. यामधील एका विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारलं तर त्याने स्वत:चं नाव कॅप्टन रोहन भसीन असं सांगितले. 30 वर्षानंतर आज तो रोहन भसीन हा सुधा सत्यन प्रवास करत असलेल्या विमानाचा पायलट होता.
विमानात असणाऱ्या एअर हॉस्टेसना सुधा यांनी आपल्याला पायलटला भेटायचं आहे अशी विनंती केली. यानंतर जेव्हा कॅप्टन रोहन भसीन आणि सुधा सत्यन यांची भेट झाली तेव्हा सुधा सत्यन यांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहन यांच्या आईने हे भावनिक क्षण आपल्या कॅमेरात टिपले. त्यांनी पायलट रोहन आणि शिक्षिका सुधा सत्यन यांचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले. यामध्ये रोहन भसीन यांच्या बालपणीचा साधारणपणे 1990-91 च्या दशकातील सुधा सत्यन यांच्यासोबत फोटो शेअर केला.
रोहन यांच्या आई निवेदिता भसीन यांनी ट्विटरवर लिहलंय की, प्ले स्कूलमध्ये प्रवेश घेताना शिक्षिकेने त्यांच्या मुलाला नाव विचारलं होतं. त्यावेळी माझ्या मुलाने लगेच कॅप्टन रोहन भसीन असं नाव सांगितले. त्यावेळी त्याचं वय तीन वर्ष होतं. आज त्याच शिक्षिका शिकागोला जात असताना त्यांच्या विमानाचा पायलट हाच रोहन भसीन होता.
रोहन यांचे आकाशाला गवसणी घालायचे स्वप्न घरातूनच सुरु झालं होतं. रोहन यांचे आजोबा जयदेव भसीन हे सुद्धा पायलट होते. 1954 साली ते कमांडर बनले होते. रोहन याचे आई-वडिलही इंडीयन एअरलाईन्सशी जोडलेले आहेत. रोहन यांनी पायलट बनण्याचं प्रशिक्षण 12 वी नंतर सुरु केलं. त्यानंतर इन-एअर अनुभवासाठी को-पायलट म्हणून 2007 पासून सुरुवात केली. सुधा सत्यन मुंबईत प्ले स्कूल चालवतात.