भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. बदलत असलेल्या लोकसंख्येमधील समिकरणाचा हवाला देत देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी युद्ध सुरू होईल, असा दावा कैलाश विजयवर्गीय यांनी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीचा संदर्भ देत केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कैलाश विजयवर्गीय यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्याचं हे विधान बेजबाबदारपणाचं असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे. तसेच कैलाश विजयवर्गीय यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
इंदूरमध्ये रविवारी रक्षाबंधनाशी संबंधित एका कार्यक्रमामध्ये बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, सामाजिक समरसता ही आज खूप आवश्यक आहे. मी नुकताच लष्करातील एका निवृत्त अधिकाऱ्यांना भेटलो. ते सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रिय असतात. त्यांनी सांगितलं की, या देशामध्ये ३० वर्षांनंतर यादवी सुरू होईल. तसेच देशामधील लोकसंख्येचं समिकरण ज्या प्रकारे बदलत आहे ते पाहता ३० वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही याबाबत विचार आणि चिंतन करत आहोत. हिंदू शब्द कसाकाय भक्कम होईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काही लोक इंग्रजांप्रमाणे फूट पाडा आणि राज्य करा असं धोरण राबवत आहेत. ते केवळ खुर्चीसाठी हिंदू धर्माला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावाही विजयवर्गीय यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी कैलाश विजयवर्गीय यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, कैलाश विजयवर्गीय यांनी केलेलं विधान हे बेजबाबदारपणाचं आहे. ते देशात अस्थिरता आणि भीतीचं वातावरण निर्माण करणारं आहे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर माफी मागितली पाहिजे.