नवी दिल्ली : भारतीय राजनायिक क्षेत्रात अमीट छाप उमटवून ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले मंगळवारी निवृत्त झाले. शेवटच्या दिवशी नियमित बैठका, भेटीगाठी करणाऱ्या गोखले यांनी अनौपचारिक निरोप समारंभही टाळला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट वगळता गोखले राजकीय भेटींपासूनही दूर राहिले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने छोटेखानी निरोप समारंभ सोमवारीच दिला.कार्यालयीन मोबाइल उद्यापासून वापरणार नाही, असा लघुसंदेश त्यांनी व्यक्तिगत मोबाइल क्रमांकावरून सहकाऱ्यांच्याही व्यक्तिगत क्रमांकावर पाठवला.ते आज नेहमीप्रमाणे कार्यालयात दाखल झाले. नियमित बैठका घेतल्या. पण प्रसारमाध्यमांशी बोलण्यास वा मुलाखत देणे त्यांनी टाळले. सत्ताकेंद्राच्या झगमगाटापासून ते आता दूर पुण्यात स्थायिक होणार आहेत.चीनमध्ये ते भारताचे राजदूत असताना गोखले यांनी डोकलामसारखा संवेदनशील पेचप्रसंग कुशलपणे हाताळला. ते १९८१ साली परराष्ट्र सेवेत दाखल झाले. कुशाग्र मितभाषी असे त्यांचे वर्णन केले जाते.हाँगकाँग, बीजिंग, न्यूयॉर्कमध्येही ते होते. चायना अँड ईस्ट एशियाचे संचालक, संयुक्त सचिवपद त्यांनी सांभाळले.मलेशिया, जर्मनी, चीनमध्ये ते राजदूत होते. त्यांची २९ जानेवारी २०१८ रोजी परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती झाली होती.तरणजीत सिंग सन्धू अमेरिकेतील नवे राजदूत- भारतीय परदेश सेवेतील (आयएफएस) ज्येष्ठ सनदी अधिकारी तरणजीत सिंग सन्धू यांची भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले.- सन्धू सध्या भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त आहेत. सन १९८८ च्या ‘आयएफएस’ तुकडीतील सन्धू वॉशिंग्टनमध्ये हर्षवर्धन श्रिंंंगला यांची जागा घेतील. श्रिंंंगला यांची परराष्ट्र सचिवपदी नेमणूक झाली आहे.परराष्ट्रमंत्र्यांनीदिल्या शुभेच्छाभारतीय राजनायिक (डिप्लोमसी) क्षेत्रात विजय गोखले यांचे मोठे योगदान आहे. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा.- एस. जयशंकर (परराष्ट्रमंत्री)
३९ वर्षांच्या सेवेनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 2:28 AM