नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे वजन 1.5 किलो वाढल्याने आंदोलनाविषयी शंका उपस्थित होत आहे. राजभवनाच्या एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, काल(दि.15) दुपारी सत्येंद्र जैन यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यावेळी ही माहिती समोर आली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. गेल्या गुरुवारी सायंकाळी डॉक्टरांनी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांचे वजन 80 किलो असल्याची नोंद होती. शुक्रवारी दुपारी वजन केले तेव्हा 81.5 किलो भरले. म्हणजे एका दिवसात 1. 5 किलोने त्यांचे वजन वाढले. त्यामुळे या मंत्र्यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील 'आयएएस' अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी राज्यपाल अनिल बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे.