Government Company For Sale: एअर इंडिया (Air India) कंपनीचं यशस्वीरित्या खासगीकरण झाल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एका सरकारी कंपनीचं खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. सरकारची मालकी असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) कंपनीच्या विक्रीसाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या कंपनीच्या विक्रीसाठी सरकारला खरेदीदार देखील सापडल्याची माहिती समोर आली आहे.
अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) कंपनीतील १०० टक्के भागीदारी आणि व्यवस्थापन विक्री करण्यासाठी सरकारला लिलावात सहभागी होण्यासाठी एक खासगी कंपनी प्राप्त झाली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. 'सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (CEL) निर्गुंतवणूकीच्या आरखड्यानुसार लिलावासाठी उत्सुक कंपनी सापडली आहे. यासाठीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.
CEL ही केंद्र सरकारची इंजिनिअरिंग कंपनी आहे. कंपनीचा कारखाना गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद येथे आहे. कंपनीत सोलर फोटोवोल्टेइक्स, फिटर्स आणि piezo ceramics तयार केले जातात. १९७७ साली भारतात पहिल्यांदाच सोलर सेल आणि १९७८ साली सोलर पॅनलची निर्मिती केली होती. याच कंपनीनं १९९२ साली भारतात पहिल्यांदाच सोलर प्लांटची स्थापना केली होती. तर २०१५ साली पहिल्यांदाच crystalline फ्लेक्सिबल सोलर पॅनलचं उत्पादन केलं होतं. ज्याचा वापर रेल्वेच्या डब्यांवर करण्यात येत आहे. दरम्यान, ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळेच सरकारनं कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे.