तेजस एक्सप्रेसच खासगीकरण केल्यानंतर सरकारडून आणखी 150 रेल्वेगाड्या आणि 50 रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. सचिव स्तरावरील एका पथकाला ही कामगिरी सोपविण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे. रेल्वे विभागाला 400 निवडक रेल्वे स्थानकांना फर्स्ट क्लास बनवायचं होतं. पण, गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत प्रयत्न सुरू असले तरी, जेथे ईपीसी मोडद्वारे काम झाले आहे, त्या काही ठराविक घटकांना सोडलं तर अद्यापही काम सुरू झालं नाही.
मी रेल्वेमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यानुसार निदान 50 रेल्वे स्थानकांवर हे काम प्राथमिक स्वरुपात सुरू केलं पाहिजे, असं लक्षात आलंय. ज्याप्रमाणे 6 विमानतळांच खासगीकरण केलंय, त्याप्रमाणे रेल्वेचही करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातील 150 रेल्वे स्थानकांचं खासगीकरण करण्याचं ठरवल्याचं कांत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान, तेजस एक्सप्रेस ही भारतातील पहिली रेल्वेसेवा आहे, जी खासगी प्रणालीवर सुरू झाली आहे. प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याचा मानस लक्षात ठेऊन हा प्रयोग करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तेजस एक्सप्रेस स्टेशनवर उशिरा पोहोचल्यास प्रवाशांना त्यांचे भाडेही परत दिले जाते.