पटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात कलह सुरु आहे. लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी सून ऐश्वर्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तिने ऑक्टोबरमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता, असे सांगत राबडी देवी यांनी तक्रार दाखल केली आहे. पार्टीचे आमदार शक्ती सिंह यादव यांच्यासोबत चर्चा सुरू होती. यावेळी ऐश्वर्याने अचानक खोलीत येत माझ्यावर हल्ला केला. तसेच, मला शिवीगाळ केली, असा दावा राबडी देवी यांनी केला आहे. तसेच खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकीही ऐश्वर्याने असल्याचे राबडी देवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ऐश्वर्या हिने गेल्या रविवारी सासरी छळ होत असल्याचा आरोप करत कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ऐश्वर्या हिने सासू राबडी देवी तसेच अन्य कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले होते. राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली.
त्यानंतर निवासस्थानी नियुक्तीला असलेल्या सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. तसेच हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप ऐश्वर्याचा होता. दुसरीकडे, ऐश्वर्या हिच्या आरोपांवर आमदार शक्ती सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित होतो, राबडी देवींनी ऐश्वर्याला मारहाण केलेली नाही. ऐश्वर्याचे आरोप निराधार आहेत, असे शक्ती सिंह यांनी म्हटले.
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रतापने गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील कौटुंबिक न्यायालयात ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. तेजप्रतापने आरजेडी नेते चंद्रिका राय आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्याबरोबर 12 मे 2018 रोजी लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यानंतर तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद समोर आला. तेजप्रतापने यांनी ऐश्वर्यावर प्रतारणेचा आरोप केला होता.