Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि घडामोडींची सविस्तर माहिती दिली. यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. बैठक संपल्यानंतर बाहेर येताच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने एकामागून एक बैठका घेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली असून, कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्ताननेही भारताविरोधात निर्णयांची घोषणा केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या हल्ल्याबाबत आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टींबाबत तसेच सरकारच्या पुढील दिशेसंदर्भात सर्वपक्षांच्या नेत्यांना माहिती देण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीला या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेल्या राहुल गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
सर्वपक्षीय बैठक संपल्यावर बाहेर येताच राहुल गांधी म्हणाले...
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, सर्वांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. सरकारने कोणताही निर्णय घ्यावा, संपूर्ण विरोधी पक्षाचा पाठिंबा असेल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईला समर्थन आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आप खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्यासह अनेक पक्षांचे नेते या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते.