बंगळुरू - आई तिच्या मुलासाठी काहीही करू शकते. याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली किंवा पाहिली असतील. कर्नाटकमधील गदग जिल्ह्यामध्ये डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृत गर्भवती महिलेच्या गर्भात असलेल्या अर्भकाला जीवनदान दिले आहे. येथे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने गर्भवती आईचा मृत्यू झाल्यानंतर गर्भातून तिच्या बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
जिल्ह्यातील रोना तालुक्यातील मुशिगेरी गावात राहणारी गर्भवती अन्नपूर्णा हिला घरामध्ये अचानक मिर्गीचे दोन झटके आले. त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र दुर्दैवाने वाटेतच ब्लड प्रेशर खालावल्याने तिचा मृत्यू झाला.
रुग्णालयात पोहोचल्यावर जेव्हा डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली तेव्हा गर्भामध्ये असलेल्या बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमने तत्परता दाखवत कुटुंबीयांच्या परवानगीने ऑपरेशन केले आणि १५ मिनिटांच्या शस्त्रक्रियेनंतर मुलीला जिवंत बाहेर काढले.
यामध्ये डॉ. विनोद, डॉ. जयाराज, डॉ. कीर्थन आणि डॉक्टर स्मृती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याबाबत डॉ. बसनगौडा कारगिगौडा रुग्णालयाच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही एक दुर्मीळ घटना आहे. डॉक्टरांच्या पथकाने वेगाने काम केले. जेव्हा गर्भामधील अर्भक जिवंत असल्याचे समजले तेव्हा त्यांनी ऑपरेशन करून गर्भातून बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनीही डॉक्टरांचे म्हणणे ऐकून सहकार्य केले.
या घटनेबाबत मृत महिला अन्नपूर्णा हिचे पती दु:खी होते. त्यांनी अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना ईश्वराकडे केली. वर्षभरापूर्वीच आमचं लग्न झालं होतं. आम्ही नव्या जीवनाची सुरुवात केली होती. मात्र आता ती मला सोडून गेलील. आमच्या मुलीचं जीवन आमच्यापेक्षा अधिक चांगलं, असेल, अशी अपेक्षा आहे.