लोकसभेतील एका भाषणामुळे रातोरात हिरो बनलेले भाजपाचे लडाखचे खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत लडाखमध्ये नामग्याल यांचे तिकीट कापण्यात आले. यावरून नामग्याल यांनी एवढे काम केले, लोकांचे आशिर्वाद घेतले, तरी तिकीट कापण्यात आल्याने विश्वास बसत नाहीय. हा मलाच नाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही धक्काच आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी लढायचे की नाही याचा निर्णय लडाखची जनता करणार आहे, असे म्हणत भाजपाच्या अंतर्गत फिडबॅक सिस्टीमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्याविरोधात काही लोकांनी राजकारण केले आणि षड्यंत्र रचल्याचा आरोप नामग्य़ाल यांनी केला. माझ्यासाठी ही शॉकिंग बातमी होती, असे ते म्हणाले.
मी कधी पक्षाविरोधात बोललो नाही. चुकीची वक्तव्ये केली नाहीत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या लडाखमध्ये मी प्रत्येक गावात एकदा नाही तर पाच पाच वेळा गेलो आहे. या भागात जेवढे विकासाचे काम झाले ते तुम्ही पाहू शकता. रस्ते बनत आहेत. गावे जोडली जात आहेत. पक्षाला वाढविण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. असे असले तरीही माझे तिकीट कापले गेले हे मलाच अद्याप कसे ते समजलेले नाही, असे नामग्य़ाल म्हणाले.
मी २०११ मध्ये भाजपात आलो. तेव्हापासून इथे पक्ष वाढत चालला आहे. येथील निवडणुकीतही भाजपा जिंकत आहे. लोकांच्या फिडबॅकवरच सर्व काही ठरत असते. चार लोक काही खिचडी शिजवत असतील तर तुम्ही खाणार का, असे थोडीच होते, असा सवालही नामग्याल यांनी केला आहे.
काही गोष्टी पक्षातच राहिल्या तर चांगले होईल. मी कोणालाही फोन केलेला नाही. मला तिकीट मिळावे म्हणून मोदी, शाह यांनाही भेटलेलो नाही. चांगले काम झाल्याचे मला माहिती होते. थोड्याच वेळात मी लडाखला पोहोचेन. पक्षाच्या, माझ्या समर्थकांचा मेळावा घेईन. लडाखची जनता काय म्हणते यावर पुढे लढायचे की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे नामग्याल यांनी स्पष्ट केले. अमर उजालाला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.