Chirag Paswan Meets Amit Shah : जातीनिहाय जनगणना, लॅटरल एण्ट्री भरतीमध्ये आरक्षण आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांवर एनडीएपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने चिराग पासवान यांच्याबद्दल बिहारपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरु झाल्या. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जाऊ लागले. अशात चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि भूमिका स्पष्ट केली.
भाजप आणि लोक जनशक्ती पक्षात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा चिराग पासवान यांनी फेटाळल्या आहेत. अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर चिराग पासवान म्हणाले की, जर भाजपची इच्छा असेल, तर लोक जनशक्ती पार्टी एनडीएसोबत बिहार विधानसभा निवडणूक लढवेल.
'मोदी पंतप्रधान असेपर्यंत...'
चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकनिष्ठ असल्याचा पुनरुच्चार केला. "आम्ही मोदींपासून वेगळे नाही आहोत. आमचा पक्ष एनडीएमध्ये आहे आणि एनडीएची इच्छा असेल, तर आगामी बिहार विधानसभा निवडणूक मित्रपक्ष म्हणून एकत्र लडण्यासाठी तयार आहे."
"नरेंद्र मोदी यांच्या प्रति माझे अतूट प्रेम आहे. जोपर्यंत ते पंतप्रधान असतील, मी त्यांच्यापासून वेगळा होऊ शकत नाही", असे विधानही चिराग पासवान यांनी केले.
काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करताहेत -पासवान
"माझ्या भूमिकामधून नेहमीच सरकारच्या धोरणाचे प्रतिबिंब उमटत आले आहे. काही लोक भाजप आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आमच्या संबंधात कोणतीही कटुता नाही. फक्त बिहारच नाही, तर राष्ट्रीय स्तरावर लोक जनशक्ती पक्षाची भाजपसोबतची युती मजबूत आहे", असे चिराग पासवान म्हणाले.
कंगना रणौत यांच्या विधानावर चिराग पासवान काय म्हणाले?
खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला. या विधानाबद्दल चिराग पासवान म्हणाले, "कंगना रणौत यांच्या विधानाबद्दल भाजपने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे आणि पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही."