केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती लोकसभेत दिली. लोकसभेत आकडेवारीसहीत सविस्तर माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा अमित शाह यांनी मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मणिपूरमधील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ)च्या एका शिष्टमंडळाने आज अमित शाहा यांची बेट घेतली. यावेळी अमित शाहा यांनी या शिष्टमंडळाला मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीला सक्षम बनवण्याचे आणि संवेदनशील भागामध्ये कुठल्याही कमतरतेला दूर करण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
या भेटीनंतर आयटीएलएफने आपली प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांच्या विनंतीनुसार हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या कुकी समुदायातील व्यक्तींच्या मृतदेहांचं दफन करण्यासाठी लोकांशी सल्लामसलत करून वैकल्पिक स्थान निश्चित करेल, असे सांगितले. दरम्यान, आयटीएलएफच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारी रेशिम उत्पादन फार्म (मणिपूर) उद्योग विभागाची जमीन ही मृतदेहांचं दफन करण्यासाठी दिली जाऊ शकते.
या शिष्टमंडळाने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, त्या जमिनीचा वापर आयटीएलएफ आणि इतर हितसंबंधीयांच्या सल्ल्यानुसार केवळ एका सामान्य सार्वजनिक उद्देशासाठी केला जाईल. भारत सरकारने शिष्टमंडळाला विनंती केली की, त्यांनी जो भाग त्यांच्या अंतर्गत येतो तिथेच मृतदेहांचं दफन करण्याच्या मुद्द्यावर अडून राहू नये. सरकारने चुकाचांदपूरच्या डीसींनी दिलेल्या सल्ल्यानुसार एका पर्यायी जागेची निश्चिती करण्याची आणि लवकरात लवकर मृतदेहांना दफन करण्यास सांगितले आहे.