ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - नोटाबंदीमुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत असलं, तरी पर्यटन क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं दिसत आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 8.91 लाख भारतभेटीसाठी आले. गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता हा आकडा 9.3 टक्क्यांनी वाढला आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये एकूण 8.16 लाख परदेशी पर्यटक भारतात आले होते, तर 2014 मध्ये हा आकडा 7.65 लाख होता.
आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात पर्यटनातून 14 हजार 474 कोटींची कमाई झाली आहे. जिकडे गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 12 हजार 649 कोटी होता. यानुसार नोव्हेंबर महिन्यात परदेशी पर्यटकांच्या भारतभेटीच्या संख्येत वाढ झाली असून उत्पन्नातदेखील 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारत दौ-यावर येणा-या परदेशी पर्यटकांमध्ये अमेरिकन नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर ब्रिटन दुस-या तर बांगलादेश तिस-या क्रमांकावर होते.
जानेवारी महिन्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत एकूण 78.53 लाख परदेशी पर्यटकांनी भारत दौरा केला. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी 10 टक्के जास्त आहे. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान परदेशी पर्यटकांकडून एकूण एक लाख 38 हजार 845 कोटींचं उत्पन्न आलं असून गतवर्षी हा आकडा एक कोटी 21 लाख 41 हजार होता.