नुकतीच बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच शहरात आणखी एक आत्महत्येची घटना समोर आली आहे.
हुलीमावू पोलीस स्टेशनचे (कायदा व सुव्यवस्था) ३३ वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने शुक्रवारी रात्री उशिरा बायप्पानहल्ली येथे ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. थिप्पण्णा अलुगुर असे मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव असून त्यांनी कन्नडमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी पार्वती आणि तिचे वडील यमुनाप्पा यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. थिप्पण्णा अलुगुर हे उत्तर कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी शहराजवळील हंडीगानुरू गावचे रहिवासी होते.
वृत्तानुसार, थिप्पण्णा अलुगुर यांचे तीन वर्षांपूर्वी पार्वतीसोबत लग्न झाले होते आणि ते बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. थिप्पण्णा अलुगुर हे शुक्रवारी घरी परतण्यापूर्वी पहिली शिफ्ट (सकाळी ८ ते दुपारी २) करण्यासाठी गेले होते. यानंतर सायंकाळी पार्वतीसोबत जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. थिप्पण्णा अलुगुर यांच्या सुसाईड नोटनुसार, रात्री काही वेळानंतर सासरे यमुनाप्पा यांनी थिप्पण्णा अलुगुर यांना फोन केला आणि धमकावले.
प्राथमिक तपासात थिप्पण्णा अलुगुर यांनी हीलालिगे रेल्वे स्थानक ते कार्मेलरम रेल्वे फाटका दरम्यानच्या रुळांवर रेल्वेसमोर उडी मारल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, थिप्पण्णा अलुगुर यांनी हे भयानक पाऊल उचलले, तेव्हा ते वर्दीत होते.
साईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?थिप्पण्णा अलुगुर यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, "माझी पत्नी पार्वती आणि तिचे वडील यमुनाप्पा यांच्या छळामुळे मी आत्महत्या करत आहे. १२ डिसेंबर रोजी त्यांनी (यमुनाप्पा) मला ७.२७ वाजता फोन केला, १४ मिनिटे बोलले पण यादरम्यान त्यांनी मला धमकावले. तसेच, त्यांनी मला मरण्यास सांगितले. जेणेकरून त्याची मुलगी (पार्वती) शांततेत जगू शकेल." दरम्यान, बायप्पनाहल्ली रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १०८, ३१(३) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.