बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. या प्रकरणी आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे काल रात्री उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना घडली. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे हवालदार जावेद खान आणि प्रमोद कुमार यांच्या हत्येतील आरोपी मोहम्मद जाहिदला चकमकीत ठार करण्यात आले आहे. एसटीएफच्या नोएडा युनिट आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुन्हेगारावर गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जाहिदवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
मोहम्मद जाहिदचा दारू तस्करांच्या टोळीशी संबंध आहे. नोएडा एसटीएफ आणि गाझीपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तो गंभीर जखमी झाला. गाझीपूरच्या दिलदारनगर पोलीस स्टेशन परिसरात ही चकमक झाली. जाहिदने गेल्या १९-२० ऑगस्टच्या रात्री बारमेर-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दोन आरपीएफ जवान जावेद खान आणि प्रमोद कुमार यांची हत्या केली होती आणि फरार झाला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
एसटीएफचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश यांनी दिलेली माहिती अशी, १९-२० ऑगस्टच्या रात्री दोन आरपीएफ कॉन्स्टेबल जावेद खान आणि प्रमोद कुमार बारमेर-गुवाहाटी एक्सप्रेस (15631) मध्ये अवैध दारूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान दारू तस्करांनी दोन्ही हवालदारांना बेदम मारहाण करून चालत्या ट्रेनमधून फेकून दिले, त्यामुळे दोन्ही हवालदारांचा मृत्यू झाला.
बदलापूरातील आऱोपीचा एन्काऊंटर कसा झाला ?
आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.