नवी दिल्ली - फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होत आहे. आता तर या वादात बिग बॉसनंतर छोटा भीमचीही एंट्री झाली आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीयांची हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करत मोदींची बिग बॉस म्हणून तुलना केली आहे, तर त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना छोटा भीम हे विशेषण म्हटले आहे. मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, "मोदी यांचे नमो अॅप गोपनीय पद्धतीने तुमचे ऑडिओ व्हिडिओ, तुमच्या मित्रांचे आणि कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक रेकॉर्ड करत आहे. तसेच जीपीएस प्रणालीद्वारे आपला पत्ता जाणून घेत आहे. ते बिग बॉस आहेत जे भारतीयांची हेरगिरी करत आहेत." मात्र राहुल गांधी यांच्या या टीकेचा स्मृती इराणी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. "राहुल गांधीजी हे काय चालले आहे. तुम्ही जे सांगत आहात त्याच्या उलट तुमची टीम काम करत आहे. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी त्यांनी काँग्रेसचेच अॅप डिलीट केले आहे. आता आपण तंत्रज्ञानाचा विचार करायला गेलो तर काँग्रेस आपला डेटा सिंगापूरमधील सर्व्हरमध्ये का पाठवते. जिथून हा डेटा कोणताही टॉम, डिक किंवा अॅनॅलिटिका मिळवू शकते. राहुलजी छोटा भीमसुद्धा जाणतो की सर्वसामान्यपणे अॅपवर मागण्यात आलेल्या परवानगीचा अर्थ हेरगिरी होत नाही,"असा टोला स्मृती इराणी यांनी हाणला आहे.
डेटा लीक वाद : बिग बॉसनंतर आता छोटा भीमची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 9:36 PM