गेल्या काही दिवसापासून बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता बिहारनंतर झारखंडमध्येही एक बांधकामाधीन पूल कोसळला आहे. गिरिडीह जिल्ह्यातील देवरी ब्लॉकमध्ये अर्गा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा पिलर खचला, त्यामुळे गर्डर तुटून पूल उद्ध्वस्त झाल्याचे समोर आला आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या पावसातही तग धरू न शकणाऱ्या फत्तेपूर-भेलवाघाटी मार्गावरील कारीपहारी गावातील अर्गा नदीवर हा पूल बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बांधकामाधीन पुलाचा एक पिलर खचला त्यामुळे गर्डर तुटून पडला. दुसरा पिलरही वाकडा झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसात रात्री आठच्या सुमारास एक पिलर तिरका झाला. यानंतर मोठ्या आवाजाने बांधकामाधीन पुलाचा गर्डर तुटून नदीत पडला.
आवाज एवढा मोठा होता की तो ऐकून आजूबाजूच्या घरात राहणारे लोक घाबरले. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता बांधकाम विभागाकडून साडेपाच कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत होता. हा पूल बांधण्याचे कंत्राट ओम नमः शिवाय या बांधकाम कंपनीला देण्यात आले होते.
शेजारच्या झारखंड, बिहारमध्ये गेल्या ११ दिवसांत पाच पुलांनी जलसमाधी घेतली आहे. १८ जून रोजी अररियातील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल पाडण्यात आला. यानंतर २२ जून रोजी सिवानमधील गंडक नदीवर बांधलेला पूल कोसळला. हा पूल सुमारे ४०-४५ वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.