पाटणा : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतील रूद्रावतामुळे चर्चेत असलेले नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत भाषेवरून नितीश यांनी द्रमुकच्या खासदाराला हिंदी शिकण्यास सांगितले होते. आता बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा आणखी एक अनोखा अंदाज पाहायला मिळाला, ज्यावरून भाजपाने त्यांना लक्ष्य केले. राजधानी पाटणा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पशु संसाधन विभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील नितीश कुमार यांची एक कृती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
खरं तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला अँकरचे अभिनंदन करून उपस्थितांना जल्लोष करण्याची संधी दिली. यानंतर नितीश कुमार यांनी तीन दिवसीय बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो-२०२३ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन महाविद्यालयाचे देखील उद्घाटन केले. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार पाटणा येथे बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो-२०२३ च्या उद्घाटनासाठी मंचाकडे जात होते. मुख्यमंत्र्यांना स्टेजवर येताना पाहून कार्यक्रमाच्या महिला अँकरने संबोधित करताना म्हटले, "मा. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावे आणि उपस्थितांना संबोधित करावे. त्यांच्यासोबत असलेल्या डॉ. एन. विजया लक्ष्मी मॅडम आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचे खूप खूप स्वागत." यानंतर नितीश यांनी स्टेजवर पोहचताच मिश्किलपणे अँकरचे अभिनंदन केले. नितीश कुमार यांनी महिला अँकरच्या खांद्यावर हात ठेवला आणि 'तुमचेही अभिनंदन' असे म्हटले. नितीश कुमार यांचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले
सुशील कुमार मोदींची बोचरी टीका मात्र, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी व्हायरल व्हिडीओवरून नितीश यांच्यावर सडकून टीका केली. "नितीश कुमार यांनी सार्वजनिक व्यासपीठावर महिला अँकर सोमा चक्रवर्ती यांना दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि त्यांचे तोंड त्यांच्या चेहऱ्याजवळ घेतले. ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. मुख्यमंत्र्यांच्या तीव्र लैंगिक निराशेमुळे त्यांच्या बोलण्यातून, हावभावातून आणि सार्वजनिक वर्तनातून महिलांना लाजवणाऱ्या आणि अपमानित करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत", अशा शब्दांत मोदी यांनी नितीश यांच्यावर बोचरी टीका केली.