नवी दिल्ली – भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(CDS) जनरल बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्यासोबत पत्नी आणि लष्करातील १३ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक पार पडली.
रिपोर्टनुसार, या बैठकीत देशाच्या पुढील सीडीएस पदाच्या नावासाठी चर्चा झाली. चीनसोबत सुरु असलेल्या वादातून सरकार सैन्यातील अधिकाऱ्याला या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवणं गरजेचे असल्याचं म्हटलं. अधिकृतपणे या बैठकीत कुठलीही मोठी घोषणा केल्याचं समोर आलं नाही. परंतु बैठकीदरम्यान CDS पदासाठी ज्या नावांची चर्चा झाली त्यात सर्वात चर्चेत असणारं नाव लष्करप्रमुख एम एम नरवणे यांचे आहे. कारण नरवणे हे तिन्ही सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी आहेत.
जनरल नरवणे लष्कर प्रमुखपदावरुन पुढील वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. लष्कराच्या नियमानुसार, चीफ डिफेन्स स्टाफ पदासाठी अधिकारी ६५ वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात. तर तिन्ही सैन्य प्रमुखांचा कार्यकाळ ६२ वर्षापर्यंत किंवा ३ वर्षाचा कार्यकाळ असतो. विशेष म्हणजे बारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख इथं गेल्या १९ महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. या भागात सैन्याला मजबूत करण्यासाठी सीडीएस रावत मोठी जबाबदारी सांभाळत होते. योजना बनवणे, काम, ट्रेनिंग, निधी पुरवणे हे सगळं काम बिपिन रावत करायचे. तिन्ही सैन्यदल आणि संरक्षण मंत्रालय यांच्यातील मध्यस्थ म्हणून सीडीएस काम करत होते. त्यामुळे या पदावर लवकरात लवकर नेमणूक व्हावी यासाठी सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नेमका अपघात झाला कसा?
‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत यांचा कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर क्रॅशमुळे मृत्यू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडाची शक्यता वायुदलाकडून तपासण्यात येत आहे. या अपघाताचे नेमके कारण ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’तून समोर येईलच; परंतु देशातील सुरक्षित हेलिकॉप्टरचा अशा प्रकारे अपघात झाल्याने वायुदलातील अधिकारी व तज्ज्ञांनादेखील धक्का बसला आहे. व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशा प्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.