कोलार - मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना कर्नाटकाच्या चन्नाकल मालुर येथे घडली. वर पक्षाकडची मंडळी पद्मावती कल्याण मंडप येथे वधूची वाट पाहत थांबलेले असताना वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवरी मुलीच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला. त्यांनी लग्नासाठी पळून गेलेल्या वधूच्या चुलत बहिणीला तयार केले.
पण या सर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला. त्यामुळे अखेर हे लग्न रद्द झाले. बंगळुरुपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या चन्नाकल मालुर येथे शनिवारी हे नाटय घडले. पद्मावती कल्याण मंडप हॉलमध्ये लग्नाआधीच्या विधींसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली. पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही.
संध्याकाळी सातपासून विधी सुरु होणार होते. मुलाकडच्यांनी वधूच्या आई-वडिलांशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन स्विचऑफ येत होता. काहीतरी वाईट घडलय असा त्यांना संशय आला. वरपक्षाने लगेच वधूचे गाव गाठले. त्यावेळी वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झालीय हे समजल्यानंतर वर पक्षाचा पारा चढला. दोन्ही बाजूंमध्ये बरीच वादावादी झाली. तणाव वाढला होता.
अखेर ज्येष्ठांनी यावर तोडगा काढला आणि वधूच्या चुलत बहिणीला लग्नासाठी तयार केले. रविवारी सकाळी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. दोन्हीकडचे कुटुंबिय सकाळी 8.15 ते 9 दरम्यानच्या मुहूर्ताची तयारी करत होते. पण त्याच दरम्यान वर मुलगा त्याच्या कक्षात नसल्याचे समजले. बरीच शोधाशोध करुनही वर मुलगा कुठेही सापडला नाही. अखेर दोन्हीकडच्यांनी हा विवाह मोडल्याचे जाहीर केले.