Ashwini Vaishnaw Budget 2024: लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला. रोजगार आणि ग्रामीण विकासावर अधिक खर्च करण्याबरोबरच काही राज्यांना अधिक पैसा देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा केलेली नसली तरी यासाठी २ लाख ६२ हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्यासोबत रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी १५ हजार ५११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोट्यवधी रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर ८३ मिनिटे भाषण केले. पण या सगळ्यात रेल्वेचे नाव फक्त एकदाच ऐकायला मिळाले. त्यामुळे रेल्वेसाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली. "रेल्वे सध्या अडीच हजार नॉन-एसी डबे बनवत आहे आणि येत्या तीन वर्षांत आणखी दहा हजार अतिरिक्त नॉन-एसी डबे बनवले जातील. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे आणि मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किमतीत सुरक्षितपणे प्रवास करता यावा हा रेल्वेचा उद्देश आहे. या गाड्या हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी ४५० रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या सुविधा देणार आहेत," अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
"२०१४ पूर्वी रेल्वेसाठी भांडवली खर्चावरील गुंतवणूक सुमारे ३५,००० कोटी रुपये होती. आज ती २.६२ लाख कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी हा विक्रमी भांडवली खर्च आहे. रेल्वेत अशा गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचा खूप आभारी आहे. २०१४ पूर्वीची ६० वर्षे पाहिल्यास, ट्रॅकची क्षमता आहे की नाही याची खात्री न करता नवीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अवस्थेशी कोणताही संबंध नसलेल्या पूर्णपणे लोकप्रिय उपाययोजना केल्या गेल्या. मात्र गेल्या १० वर्षांमध्ये पाया योग्यरित्या घातला गेला आहे याची खात्री करण्यावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे," असे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
"आतापर्यंत ४०,००० किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तर ३१,००० किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. २०१४ पूर्वीचे विद्युतीकरण पाहिले तर ६० वर्षांत २०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण झाले होती. केवळ १० वर्षात ४०,००० किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ट्रॅक बांधणीचा वेग बघितला तर २०१४ मध्ये तो फक्त चार किमी प्रतिदिन होता तर गेल्या आर्थिक वर्षात तो १४.५ किमी प्रतिदिन होता. प्रवाशांच्या सुरक्षेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. मागील वर्षी सुरक्षेशी संबंधित उपक्रमांमध्ये ९८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, या वर्षी सुरक्षेशी संबंधित उपाय योजनांसाठी १,०८,००० कोटी रुपयांची तरतूद आहे," असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.