ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - लाल किल्ल्यात निकामी करण्यात आलेलं ग्रेनेड सापडलं आहे. ग्रेनेड सापडल्याने राजधानीत सुरक्षायंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. लाल किल्ल्यातील विहिरीत हा ग्रेनेड सापडला. नियमित कामकाजादम्यान ग्रेनेड आढळला. अशाप्रकारे स्फोटक वस्तू सापडण्याची ही पहिलीच वेळ नसल्याने सुरक्षायंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.
माहिती मिळताच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनएसए) आणि जिल्हा पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठं सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं असून संपुर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.
सापडलेलं ग्रेनेड तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासणी केल्यानंतर हे ग्रेनेड नेमकं कुठून आलं याची माहिती मिळू शकेल. काही जणांनी ग्रेनेड दुस-या महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तवली आहे.
याआधीही सापडली होती स्फोटके -
याआधीही फ्रेबुवारी महिन्यात लाल किल्ल्यातील विहिरीत जिवंत काडतुसे आणि दारूगोळ्याच्या पेट्या आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांत प्रचंड खळबळ उडाली होती. स्मारकाच्या स्वच्छतेचे काम सुरू असताना हा दारूगोळा आढळून आला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (एएसआय) लाल किल्ल्यातील विहिरींची स्वच्छता करण्यात येत असताना पब्लिकेशन इमारतीमागील एका विहिरीत काडतुसे आणि दारूगोळा आढळून आला होता. पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करून एनएसजी आणि लष्कराला घटनेची माहिती दिली होती.
विहिरीत पाच मोर्टार आणि ४४ जिवंत काडतुसे आढळून आली होती. याशिवाय वापरलेली ८७ काडतुसेही आढळून आली होती.
झाला होता दहशतवादी हल्ला -
२२ डिसेंबर २००० रोजी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने लाल किल्ल्यावर हल्ला केला होता. लष्करच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जवान शहीद झाले होते. त्यानंतरही अनेकदा लाल किल्ल्यावर हल्ल्याच्या अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथे मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि दारूगोळा सापडणे गंभीर आहे.