नवी दिल्ली - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यापाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही (devendra fadnavis) राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, फडणवीस दिल्लीला गेल्याने आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात दिल्लीत खलबतं होणार असल्याची चर्चा आहे. तसेच, मनसे आणि भाजपा एकत्र येईल का, यावरही राज्यात चर्चा रंगली आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते. एकीकडे विधानपरिषद निवडणुका आणि दुसरीकडे राज ठाकरेंच्या भेटीने मनसेसोबत युती या विषयावर चर्चा होणार का, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर, दिल्लीत फडणवीस हे मोदींना भेटणार का याचीही चर्चा होत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर सांगितलं. तसेच, राज्यातील सद्यस्थिती आणि आगामी महापालिका निवडणुकांबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार आहेत, त्यामुळे आज पुन्हा एकदा राज्यातील राजकीय खलबतं राजधानीत रंगणार आहेत. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याची राज्यभर चर्चा होत आहे.
मुंबईत बिनविरोध, इतर ठिकाणी काय?
मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तेथे एक जागा शिवसेनेकडे आणि एक जागा भाजपकडे आहे. याच पद्धतीने उर्वरित जागा बिनविरोध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. नागपूर आणि धुळे या दोन जागा भाजप एकतर्फी जिंकणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. म्हणूनच काँग्रेस आणि भाजपने केवळ लढाई करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याची चर्चा आहे.
कोल्हापूरचे काय ?
कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहता भाजपने निर्णय घेतल्यास महाडिक काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. जर दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर हीच लढाई पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी माघारीच्या दुपारी तीनपर्यंत साऱ्यांचे लक्ष दिल्ली, मुंबईतील निरोपाकडे राहणार आहे.