नवी दिल्ली - देशभरात आधार कार्डआणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्यावर वारंवार प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहेत. आधार कार्ड आणि डेटा सुरक्षितता हा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. याचसंदर्भातील चर्चेदरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार कार्डसंबंधी ट्विटरवर एक आव्हान दिले. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्णतः फसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं.
ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार कार्ड क्रमांक शेअर केला आणि डेटा हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिले. नुकसान किंवा हानी पोहोचेल, अशी कोणतीही माहिती शोधून दाखवावी. शर्मा यांचे आव्हान एलियट एल्डर्सन नावाच्या युजरनं स्वीकारलं. केवळ स्वीकारलंच नाही तर पूर्णदेखील केले. फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा यावेळी एलियट एल्डर्सन यानं करत शर्मा यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केली. काही मिनिटांतच एलियट एल्डर्सननं शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक आणि त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटोदेखील सार्वजनिक केले. मात्र शर्मा यांच्याबाबतची माहिती शेअर करताना कोणत्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी माहिती व फोटो ब्लर केले.
आव्हान पूर्ण केल्यानंतर एलियट एल्डर्सननं म्हटले की, आपण आधार कार्ड योजनेविरोधात नाही. मात्र आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो.