चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 08:23 PM2019-07-22T20:23:52+5:302019-07-22T20:29:39+5:30
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा काँग्रेसवर निशाणा
पाटणा: चंद्रयान-२नं अवकाशात झेप घेतल्यावर आता राजकारण सुरू झालं आहे. चंद्रयान-२च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काँग्रेसनं ट्विट करत इस्रोची स्थापना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी केली होती, असं म्हणत मोदी सरकारला टोला लगावला. काँग्रेसच्या या खोचक टीकेला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला, याची आठवण देशाला करुन देण्याची हीच योग्य वेळ आहे, असा चिमटा सिंह यांनी ट्विटमधून काढला. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
चंद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काँग्रेसनं पंडित जवाहरलाल नेहरुंचा शास्त्रज्ञांसोबतचा एक फोटो ट्विट केला. 'नेहरुंच्या दूरदृष्टीचं स्मरण करण्यासाठी आजचा दिवस अगदी सुयोग्य आहे. नेहरुंनी १९६२ मध्ये INCOSPARच्या स्थापनेच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची सुरुवात केली. त्यानंतर हीच संस्था इस्रो म्हणून नावारुपास आली,' असं ट्विट करत काँग्रेसनं मोदी सरकारला टोला लगावला. काँग्रेसनं ट्विटमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचादेखील उल्लेख केला. 'चंद्रयान-२ मोहिमेला २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीच मान्यता दिली होती. या गोष्टीचं स्मरण करण्यासाठीदेखील आजचा दिवस अतिशय योग्य आहे,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं.
This is a good time to remember the visionary move of India's first PM Pandit Jawaharlal Nehru to fund space research through INCOSPAR in1962 which later became ISRO. And also Dr. Manmohan Singh for sanctioning the #Chandrayan2 project in 2008. pic.twitter.com/2Tje349pa0
— Congress (@INCIndia) July 22, 2019
काँग्रेसनं नेहरु आणि मनमोहन सिंग यांचा संदर्भ देत केलेल्या खोचक टीकेला भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी उत्तर दिलं. 'चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला होता, हे देशाला सांगण्याची हीच वेळ आहे,' अशी कोपरखळी सिंह यांनी मारली. सिंह अनेकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात संयुक्त जनता दलानं इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावर नवरात्र काळात फलाहाराचं आयोजन केलं असतं, तर किती चांगलं चित्र दिसलं असतं, अशा खोचक शब्दांत सिंह यांनी संयुक्त जनता दलावर निशाणा साधला होता. आपण कर्मधर्मात मागे का पडतो आणि दिखाऊपणात पुढे का असतो, असा सवालदेखील त्यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता.