ग्वालियार – मध्य प्रदेशातील राजकारणात आणखी एका ऑडिओ क्लीपने खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर आता भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये तिकीटावरुन ५० लाख रुपयांच्या व्यवहाराची चर्चा होत आहे. व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपबद्दल सांगितलं जात आहे की, हा ऑडिओ विधानसभा निवडणुकीच्या वेळचा आहे. मात्र अद्याप कोणीही ऑडिओ क्लीपची पुष्टी केली नाही.
या कथित ऑडिओ क्लीपमध्ये अनिता जैन नावाच्या महिलेला तिकीट देण्याची वार्ता सुरु होती. पण अशोक नगरमधून तिला तिकीट मिळाले नाही. महिलेने या ऑडिओ क्लीपमध्ये अग्रवाल नावाच्या कोणा व्यक्तीला ५० लाख रुपये देण्याची भाषा केली आहे. ऑडिओ क्लीपच्या सुरुवातीला अनिता पहिल्यांदा ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रणाम करते. त्यानंतर दुसऱ्या बाजून शिंदे यांनी माफ करा अनिता, मी यासाठी काय करु शकलो नाही असं सांगतात.
तिकीटावर दावा करणारी अनिता म्हणते की, महाराज सर्व समाजातील लोक माझ्यासोबत आहे. असं पहिल्यांदाच होत आहे की, अशोकनगरची जागा काँग्रेसच्या बाजूने जात आहे. मी पूर्ण तयारी केली आहे. तर दुसरीकडे अशोक नगर जागेवरील दुसरे दावेदाराबाबत महिला विरोधात सांगत असते. तो उमेदवार जिंकणार नाही. अशोक नगरमध्ये त्याच्या विरोधात अनेक लोक आहेत. तिकीटासाठी अनिता रडत रडत आपलं म्हणणं मांडत असल्याचं ऐकायला येतं.
तर अनिताला ज्योतिरादित्य शिंदे आश्वास देत सांगतात की, तुम्ही चिंता करु नका, मला माहिती आहे आपलं सरकार बनेल, मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्हाला न्याय आणि सन्मान देऊ, तर दुसरीकडून अनिता कोणत्या व्यक्तीचं नाव घेत आरोप करते की, तो प्रत्येक निवडणुकीत हत्या करतो, महाराज बोलतात मला माहिती आहे. संभाषणादरम्यान शिंदे सांगतात, यावेळी जे लोक ५ हजारापेक्षा कमी हरले आहेत त्यांना राहुल गांधी मध्य प्रदेशातून तिकीट देतील, मी प्रयत्न केले पण राहुलजींचे आदेश असल्याने काय करु असं ते सांगतात.
मध्य प्रदेशात व्हायरल ऑडिओ क्लीपवरुन राजकारण सुरु असताना शिंदे समर्थकांनी याला बनावट असल्याचं म्हटलं आहे. अनिता जैन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, माझं नाव सर्व्हेमध्ये होतं. तिकीट न मिळाल्यानंतर महाराजांचा फोन आला. चर्चेदरम्यान त्याठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. मी रडत होती आणि फोन आपटून निघून गेली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांपैकी ही ऑडिओ क्लीप बनवली असेल. पैसे मला परत मिळाले असं त्यांनी सांगितले.