जुनागड (गुजरात) : भ्रष्टाचारी विरोधकांना आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. ते सध्या बेलवर आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही त्यांना जेलमध्ये (तुरुंगात) पोहोचवू, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली. कॉँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार असे सांगत, त्यांनी कॉँग्रेसने गरिबांच्या पैशाची लूट सुरू झाल्याची टीकाही केली.
जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी प्राप्तिकर खात्याने टाकलेल्या धाडींमध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे गुपित सांगितले. प्राप्तिकर खात्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या सहकाऱ्याकडे टाकलेल्या धाडींमध्ये मोठी रक्कम जप्त केल्याचे वृत्त आहे. राज्याची सत्ता कॉँग्रेसला मिळून सहा महिनेच झाले असताना, त्यांनी जनतेच्या पैशांची लूट सुरू केली आहे.
यापूर्वी कर्नाटक हे कॉँग्रेसचे एटीएम होते. आता त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची भर पडली आहे. आम्ही पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकमुळे कॉँग्रेसला पोटशूळ का उठला, असा सवाल करून मोदी म्हणाले की, जो पक्ष त्याचे पुरावे मागतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणार का?दहा वर्षे देशात रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार होते. त्यामुळे त्यांना काही करता आले नाही. तुम्हाला जे करता आले नाही, ते जर कोणी करीत असेल तर त्यांना का थांबविता? असा सवाल त्यांनी केला. (वृत्तसंस्था)गुजराती नेत्यांना दिला त्रासकॉँग्रेसने कायमच गुजरातच्या नेत्यांना त्रास दिल्याची टीका मोदी यांनी केली. त्यामध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि मी यांना कॉँग्रेसकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले. मात्र, आपण अशा त्रासाला घाबरत नसल्याचे मोदी म्हणाले.