नवी दिल्ली, दि. 30 - सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांनी पुन्हा एकदा लष्करी गणवेश अंगावर चढवला आहे. लष्करी गणवेशातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांची अखेर नऊ वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली. सुटकेच्यावेळी पुरोहितांसोबत त्याचे कुटुंबिय आणि लष्कराचे जवान देखील होते.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना युनिटमध्ये घेण्यात येईल मात्र त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही असं लष्कराने आधीच स्पष्ट केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सशर्त जामीनाचा लष्कर मुख्यालयाकडून अभ्यास केल्यानंतरच लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. सुटका झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांनी आपल्याला पुन्हा एकदा देशसेवा करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.
कुलाबा मिलिटरी स्टेशन हे लष्कराच्या पुणेस्थित दक्षिण कमांड मुख्यालयाच्या अखत्यारीत येते. ‘ले. कर्नल पुरोहित यांना अटक झाली, तेव्हा ते मध्य प्रदेशातील पचमढी येथे लष्कर तळावर पर्शियन भाषा शिकण्यासाठी कार्यरत होते. पचमढीतून त्यांना फसवून अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता. पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने मात्र जामिनाला विरोध केला होता. पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा असे एनआयएचे म्हणणे होते. न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहित यांना जामिन मंजूर केला पाहिजे असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला होता. मालेगाव प्रकरणात आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरला जामिन मिळतो मग पुरोहितला का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी केला होता. साक्षीदारांच्या साक्षीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात झालेल्या या स्फोटप्रकरणी एनआयएने एकूण १४ जणांना आरोपी बनवले होते. यात पुरोहित यांचाही समावेश होता. बाइकवरील दोन बॉम्बच्या स्फोटांत सात जण ठार झाले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. पुरोहित आणि प्रज्ञा ठाकूरशिवाय शिवनारायण कालसांगरा, श्याम साहू, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय, राकेश धावडे, जगदीश म्हात्रे, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तकालकी यांनाही अटक झाली होती.