काँग्रेस पाठोपाठ लालू यादवांच्या पक्षातील नेत्यांनाही टीव्हीवरील चर्चेत जाण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:40 PM2019-06-21T12:40:49+5:302019-06-21T12:41:30+5:30
राजदपूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास बंदी घातली आहे.
नवी दिल्ली - समाजवादी पक्षापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने देखील आपल्या प्रवक्त्यांची यादी रद्द केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रीय जनता दलाने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास मज्जाव केला आहे.
टीव्हीवर जाण्यास मज्जाव केल्यानंतरही राजद नेता, प्रवक्ता, आमदार किंवा खासदार टीव्हीवरील चर्चेत सामील झाल्यास तो राजदचा विचार मानला जाणार नाही, अशी सूचना राष्ट्रीय जनता दलचे प्रधान महासचिव आलोक कुमार मेहता यांनी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्या आदेशावरून दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजदला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत राजदचे नेतृत्व लालू यांच्या गैरहजेरीत तेजस्वी यादव यांनी केले होते.
पुढील सुचना मिळेपर्यंत राजदचा एकही प्रवक्ता टीव्हीवरील चर्चेत सहभागी होणार नाही. तसेच राजदकडून लवकरच नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. राजदपूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने देखील आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चांमध्ये सामील होण्यास बंदी घातली आहे. निवडणूकपूर्वी समाजवादी पक्षाचे अनेक नेते टीव्हीवर पक्षाची बाजू मांडताना दिसत होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर सपचे प्रवक्ते टीव्हीवरील चर्चेत दिसून येत नाही. आता राजदने देखील यावर बंदी घातली आहे.